कर्डेलवाडीची ३६५ दिवस चालणारी शाळा

कर्डेलवाडी पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्‍यातलं अगदी छोटंसं गाव. गाव कसलं वाडीच! या वाडीत भरते जिल्हा परिषदेची शाळा... अशा शाळा तर सगळ्याच खेड्यापाड्यांत आणि जवळपास सगळ्याच वाड्या-वस्त्यांत भरत असतात... मग कर्डेलवाडीचंच एवढं विशेष काय? विशेष आहे...चांगलंच विशेष आहे.. ही शाळा सुटी कधीच घेत नाही! वर्षाचे ३६५ दिवस सुरूच असते ही शाळा. थोड्या-थोडक्‍या नव्हे; तर तब्बल १४ वर्षांपासून ही शाळा एकही सुटी न घेता सतत सुरूच आहे. मुख्याध्यापक द. रा. सकट आणि त्यांच्या शिक्षिका-पत्नी बेबीनंदा हे समर्पित जोडपं ही शाळा चालवतं...या जोडप्याचा हेतू एकच ः विद्यार्थ्यांना केवळ विद्यार्थी न ठेवता ज्ञानार्थी बनवणं!

तेरा नोव्हेंबर १४ ला सकाळी दहाच्या सुमारास पुण्यात शिवाजीनगर बसस्थानकाजवळ माझी वाट पाहत थांबलेल्या मनोज बांगळे आणि त्याचा एक शिक्षकमित्र गोकुळला घेऊन शिरूर तालुक्‍यातल्या कर्डेलवाडीकडं निघालो. खरंतर माझ्या अगोदर खूप लोक तिथं जाऊन आले आहेत. सुमारे ८५ हजार लोक जाऊन आले आहेत. कर्डेलवाडी म्हणजे जणू शैक्षणिक पर्यटनकेंद्र झालं आहे. जिवाजी वाघमारेविषयी जेव्हा ‘फिरस्ती’मध्ये लिहिलं होतं, तेव्हा त्याच्या मदतीसाठी अनेक हात पुढं आले होते. (आता जवळपास नऊ लाख इतकी रेकॉर्डब्रेक मदत जमा झालीय. मनोहरपंत जाधव आणि जिवाजीच्या नावावर ती संयुक्तपणे आहे). त्या वेळी सकट नावाच्या एका शिक्षकाचा फोन आला होता. ‘जिवाजीला काही मदत लागली तर सांगा. मी आणि माझे विद्यार्थी मदत देऊ शकतो,’ असं त्यांनी आवर्जून सांगितलं होतं. शिवाय, ‘शाळेला एकदा भेट द्या किंवा मीच तुम्हाला भेटायला येतो,’ असंही ते म्हणाले होते; पण मला तीन-चारशे किलोमीटर अंतर कापायचं होतं. चांगली गोष्ट पाहायला जाताना अंतर लवकर संपतं, असा माझा अनुभव आहे. आम्ही पुणे, वाघोली करत पुणे-नगर हायवेवर फलके मळ्याच्या फाट्यावरून डावीकडं वळलो. दोन-चार छोटी गावं मागं टाकत कर्डेलवाडीत पोचलो.
कर्डेलवाडीत (जि. पुणे, ता. शिरूर) जिल्हा परिषदेची शाळा चालवणारे मुख्याध्यापक द. रा. सकट आणि त्यांची शिक्षिका-पत्नी बेबीनंदा. एकही सुटी न घेता वर्षातले ३६५ दिवस ही शाळा चालते. ‘ इथले विद्यार्थी केवळ ‘विद्यार्थी ’ राहू नयेत, तर ‘ज्ञानार्थी’ बनावेत,’ हा वसा सकट दांपत्यानं घेतला आहे.

गावातून शाळेकडं म्हणजे डाव्या बाजूनं जायच्या वाटेवर ठिकठिकाणी फलक होते. काही ठिकाणच्या भिंतीही रंगल्या होत्या. गावाचं आणि शाळेचं कर्तृत्व सांगणारी चिन्हं या फलकांवर दिसत होती. गावाला जे जे पुरस्कार मिळाले, ते ते भिंतीवर अवतरले होते. प्रत्येक पुरस्कारात शाळेचा खारीचा किंवा भारीचा वाटा होताच होता. दोन गल्ल्यांच्या बेचक्‍यात अडकलेला रस्ता पार करत आम्ही अशा एका ठिकाणी पोचलो, की जिथं हजारभर लोकवस्तीचं गाव संपलेलं असावं. झाडात लपलेली एक शाळा दिसत होती आणि शाळेवर बोर्ड झळकत होता ‘जि. प. प्राथमिक शाळा, कर्डेलवाडी...’ शाळेच्या व्हरांड्यात पोरं-पोरी रिंगण करून बसले होते. इंग्रजीचा पाठ वाचत पाठ करत ही बच्चेकंपनी बसली होती. बहुतेक ती पहिलीतली किंवा त्याच्याही खालच्या वर्गातली असावीत. सारी पोरं गणवेशात होती. प्रत्येकाच्या डोक्‍यावर गांधीबाबाची टोपी होती. राजकारण्यांनी ही टोपी बऱ्यापैकी बदनाम करून टाकलीय! त्यातून ‘टोपी घालणं’ हा शब्दप्रयोग जन्माला आलाय. रयत शिक्षण संस्थेनंतर बहुधा या शाळेतच मी अशी टोपी पाहिली. स्वच्छ, टोकदार आणि ३०-३५ रुपयांना मिळणारी ही टोपी.
मुलांच्या रिंगणाजवळ बसून एका पोराला प्रश्‍न विचारला ः ‘‘तुझं नाव काय?’’
तो म्हणाला ः ‘‘माझं खरं नाव सोहम आणि खोटं नाव संभू.’’
मग असाच प्रश्‍न एका मुलीला विचारला.
ती म्हणाली ः ‘‘माझं खरं नाव भक्ती.’’
खोटं नाव सांगताना ती किंचित अडखळली. मग असाच प्रश्‍न अन्य एका पोराला विचारला.
तोपर्यंत ती मुलगी म्हणाली ः ‘‘माझं खोटं नाव सोनू.’’ मग मुलगा म्हणाला, ‘‘माझं खरं नाव मंगेश.’’ त्यानं खोटं नाव नाही सांगितलं.
प्रत्येक विद्यार्थ्याला दोन नावं होती. एक शाळेतलं ते खरं आणि शाळेबाहेरचं दुसरं नाव खोटं... गंमत अशी, की दोन्ही नावं चालत होती.
बोलता बोलता पोरांच्या स्वप्नांना हात घातला. वेंकटेश हा डॉक्‍टर, तर वैभव हा सैनिक होणार आहे. प्राजक्ता ही शेतकरी होणार आहे. डॉक्‍टर-शिक्षक होणारी अनेक पोरं होती आणि शेतकरी होणारीही होती. बहुतेक ‘उत्तम शेती...’, हे वाक्‍य त्यांच्याकडून पाठ करून घेतलेलं असावं.
मी ज्या गोष्टीसाठी इथं आलो होतो तो प्रश्‍न विचारला. ‘शाळा किती दिवस चालते?’ त्याचं उत्तर साहिलनं दिलं. वर्षभर. अगदी रविवारीसुद्धा.
या शाळेत मुख्याध्यापक आहेत द. रा. सकट (९८२२९५६२०६). त्यांच्या पत्नी बेबीनंदा शिक्षिका आहेत. दोनशिक्षकी शाळा आहे; पण विद्यार्थिसंख्या वाढल्यानं नीलोफर समीर तांबोळी ही आणखी एक शिक्षिका नव्यानं दाखल झाली आहे.

देशभरात आणि देशाबाहेर गाजलेली शाळा मी पाहत होतो. चौथीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होती. बाकीचे तीन-चार वर्ग सुरू होते. दोन शिक्षिका अधूनमधून प्रत्येक वर्गावर जायच्या. मुलं काय करतात ते पाहायच्या. एका वर्गात मुलांची सतत नजर पडेल एवढ्या अंतरावर समानार्थी शब्दांचे फलक टांगलेले होते. भिंतीवर वेगवेगळे तक्ते होते. शेजारच्या वर्गात काही पोरं जोरजोरात सात रंग इंग्रजीतून पाठ करत होतं. संगणकाच्या लॅबमध्येही एक वर्ग सुरू होता. तिथंही इंग्रजीतूनच अभ्यास सुरू होता. एक विद्यार्थी म्हणायचा ः ‘दात घासण्यासाठी मी वापरतो.........’ दुसरी पोरं म्हणायची ः ‘ब्रश... ’ एक लक्षात आलं, की बाहेर जे चौथीच्या पोरांना येतं, ते इथं पहिलीच्याही पोरांना येतं. मराठी-इंग्रजी फाडफाड बोलतात इथं पोरं... त्यांची अक्षरं भुरळ घालणारी आहेत. मनोज आणि गोकुळ मध्येच काहीतरी प्रयोग करायचे. चार-चार वाक्‍यं बोलायचे आणि ती वाक्‍यं विद्यार्थ्यांना लिहायला सांगायचे. पोरं अचूक लिहायची. सुंदर अक्षर, शुद्ध भाषा, प्रमाण मराठी आणि यामागं प्रचंड विश्‍वास... आपण चुकतो अशी भावनाच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसायची नाही....

आज गॅस संपलेला होता म्हणून खिचडी शिजणार नव्हती. सरकार खिचडीचा आग्रह धरतं; पण जळण कुठून आणायचा, याचा विचार करत नाही. बाहेरगावाहून आलेल्या पोरांनी त्यांचा डबा खाल्ला. स्थानिक पोरांनी घरी जाऊन पोटात काहीतरी ढकललं.

शाळेत सर्वत्र शैक्षणिक वातावरण पसरलंय. कुठंही नजर टाका, काहीतरी शिकायलाच मिळतं. शाळेत कायद्यानं राबवायचे प्रकल्प आहेत. त्याच्या सर्व फायली नीटनेटक्‍या होत्या. शालेय रेकॉर्डच्या १०१ फायली सलग वाचता येत होत्या. स्त्रीभ्रूणहत्येविरुद्धची पोस्टर लागलेली होती. संगणक लॅब पूर्ण एसी होती. शाळेत ग्रंथालय होतं; पण त्यातली पुस्तकं जाणीवपूर्वक खरेदी केलेली आणि जीवनाभिमुख होती. कसलाही ताणतणाव नाही. छड्या फिरवणं नाही. चिडचिड नाही. शांतपणे सारं काही चाललेलं. वेगळंच वातावरण, जे शिकण्यासाठी आवश्‍यक असतं, तेच जाणीवपूर्वक जन्माला घातलेलं. अशा वातावरणात मुलांचा बुद्‌ध्यंक वाढत गेला. गळती कमी होत गेली. शिष्यवृत्ती परीक्षेत इथली पोरं राज्यात-जिल्ह्यात चमकू लागली. शिकणं आनंददायी असतं, हे पोरांना कळू लागलं. ४० ते ५० टक्के मतिमंद असलेला पोरगाही नॉर्मल पोरांच्या इतका धावू लागला. जी शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत होती, तिथं प्रवेशासाठी गर्दी होऊ लागली. बाहेरगावाहून मुलं येऊ लागली. एकेकाळी भकास वाटणारी शाळा बघता बघता सुंदर रूप घेऊन उभी राहिली.  मोजता येत नाहीत इतके पुरस्कार या शाळेला मिळाले. ती एक मॉडेल झाली. अनेकांनी भेटी दिल्या. कलेक्‍टर, सीईओ, पदाधिकारी... साऱ्यासाऱ्यांनी भेटी दिल्या. मुख्याध्यापकांनाही पुरस्कार दिले. शाळेला कुणी संगणक दिला, कुणी एसी दिला, कुणी सोलर एनर्जीचा सेट दिला, कुणी पाणी शुद्ध करण्याची व्यवस्था दिली. या शाळेतून बाहेर पडणारी बहुतेक मुलं पुढं विज्ञान आणि अभियांत्रिकीला गेली. तिथंही गळतीचं प्रमाण कमी आहे.
मुख्याध्यापक सकट आपल्या आदर्श शाळेचा प्रयोग घेऊन महाराष्ट्रभर फिरले.
साप, बेडूक, उंदीर आदींचा उपसर्ग विद्यार्थ्यांना होऊ नये, यासाठी शाळेत एक मांजर पाळण्यात आलं असून, त्यालाही विद्यार्थ्यांमध्येच बसण्याची सवय लागलेली आहे!

मी त्यांची वाट पाहत होतो. ते पंचायत समितीत गेले होते. परत आले. त्रस्त वाटत होते. कुणीतरी माहिती अधिकारात शाळेची १० वर्षांची माहिती मागितली आहे. माहिती जमा करता करता त्यांची दमछाक झाली. दीड-दोन पोती कागद गोळा करावे लागले. हे का, कसं होतंय, हे त्यांना सांगता येत नाही; पण दिवस उगवला की कागद गोळा करावे लागत आहेत.

सकट यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये नेलं. सगळे मानसन्मान दाखवले. शाळेविषयी लिहून आलेलं बरंच काही दाखवलं. मी थेट प्रश्‍न विचारला ः ‘‘नियमानुसार शाळा २२० दिवस चालते. १४५ सुट्या असतात. तुम्ही १४ वर्षांपासून ३६५ दिवस शाळा का चालवता?’’

सकट म्हणाले ः ‘‘त्याचं कारण आहे. इथली बहुतेक पोरं खूप गरिबीतून आलेली असतात. अनेकांना शैक्षणिक परंपरा नसते. माझ्याकडं दगड फोडणाऱ्या, भटक्‍या कुटुंबांतली अनेक मुलं आहेत. खूप खोलवर जाऊन शिकवावं लागतं. का शिकायचं हे सांगण्यात, प्रबोधन करण्यात वेळ जातो. शिक्षणाबरोबरच त्यांच्या कलागुणांनाही वाव द्यावा लागतो. इंग्रजीविषयी भीती वाटू नये, असं वातावरण तयार करावं लागतं. प्रत्येक विद्यार्थ्यात व्यक्तिगत लक्ष घालावं लागतं. शैक्षणिक वातावरण तयार करून ते टिकवावं लागतं. पोरांना शिकवत गावाचंही प्रबोधन करावं लागतं. सगळे प्रकल्प मनापासून राबवावे लागतात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या मनात शिक्षणाविषयी विश्वास आणि आकर्षण तयार करावं लागतं. कितीही राबलं तरी थोडंच वाटतं. विशेष म्हणजे, रविवार व अन्य सुट्यांच्या दिवशी आम्ही विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्याऐवजी त्यांच्या कलागुणांचा विकास करतो. सांस्कृतिक, व्यक्तिविकास, क्रीडा, शिष्यवृत्त्या, विविध स्पर्धा यांचाच विचार प्रामुख्यानं करतो.’’
‘‘सुटीच्या दिवशी पोरं येतात का?’’
सकट ः  हो. येतात. त्यांना आवड निर्माण झाली आहे. गळती होते काही प्रमाणात; पण मुलं येतात. आम्हीही येतो. मी नसलो तर माझी पत्नी असतेच. आजारपण, सणवार काहीही असो, आम्ही दोघंही किंवा आमच्यापैकी कुणीतरी एक असतंच.’’
बोलत बोलत सकट म्हणाले ः ‘‘आता लवकरच आम्ही गॅरंटी कार्ड देणार आहोत. चार वर्षं मुलं आमच्याकडं राहिल्यानंतर अमुक अमुक गोष्टी आम्ही देऊ, अशी गॅरंटी असेल या कार्डात. बघू या तर प्रयोग राबवून...’’

गॅरंटी कार्डाचं मला खूप कौतुक वाटलं. पुणे जिल्ह्यात ३०० दिवस चालणाऱ्याही आणखी काही शाळा आहेत. कर्डेलवाडीची शाळा बघून इतरांनाही प्रोत्साहन मिळतंय. अलीकडं ‘झेडपी’च्या म्हणजे सरकारी शाळा गुणवत्ताहीनतेविषयी गाजतात. शिक्षक असत नाहीत. असले तर शिकवत नाहीत. शिकवलं तरी विद्यार्थ्यांना कळत नाही. मुलांना पाढे येत नाहीत. जोडाक्षरं येत नाहीत. गळती वाढतेय. प्रायव्हेटमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढतेय. शाळा बंद पडताहेत. परीक्षा बंद झाल्यानं कुठं काय चाललंय, कळत नाहीय. या सर्व पार्श्‍वभूमीवर ३६५ दिवस चालणाऱ्या शाळेचं कौतुक केलं पाहिजे. ‘वर्षभराचा पगार म्हणजे प्रत्येक दिवसाचा पगार घेतो; मग प्रत्येक दिवस का शिकवायचं नाही? विद्यार्थ्यांना ज्ञानार्थी का बनवायचं नाही ?’ असा हेतू या उपक्रमामागं आहे... सकट हे मोठ्या आनंदानं सांगतात. अर्थात, हा प्रयोग आहे. त्याचं सार्वत्रिकीकरणहोईल की नाही आणि कसं होईल ठाऊक नाही... बहुतेक गाड्या लॅबमध्ये भरपूर ॲव्हरेज देतात; पण रस्त्यावर आल्यानंतर ढेपाळतात. कर्डेलवाडीच्या शाळेचं तसं होऊ नये, यासाठी समाजानं आणि शासनानं प्रयत्न करायला हवेत. वेगळ्या वाटेवरून जाताना सर्वप्रथम व्यवस्थाच विरोधात जाते. आज ना उद्या आपल्यालाही १४५ सुट्या गमवाव्या लागतील, अशी भीतीही त्यामागं असते. शेवटी, प्रश्‍न कोण किती दिवस शिकवतं हा नसून, काय आणि कसं शिकवतं, हाही असतो. सरकारी शिक्षण खासगीशी टक्कर देत मेटाकुटीला आलं आहे. म्हणूनच कर्डेलवाडीची शाळा आणि तिथला प्रयोग महत्त्वाचा वाटतो. तो १४ वर्षे सुरू आहे. आता सकट यांची इथून बदली झाल्यानंतर काय होणार, हा प्रश्‍न खूप महत्त्वाचा आहे. त्याचं उत्तर व्यवस्थेनंच द्यायला हवं. बहुतेक शाळांमधली पोरं भोलानाथाला ‘पाऊस कधी पडेल आणि सुटी कधी मिळेल’, असा प्रश्‍न विचारतात आणि इथली पोरं प्रत्येक ऋतूत ज्ञानाचं गाणं गातात... सुटीचं नाही...!

No comments:

Post a Comment

Total Pageviews

Powered By Blogger

Blog Archive